Roots

Wednesday, August 12, 2015

अर्धांगिनी

बस, बस ना चांदनी
डोळे मिटणे बस
स्वतःशी हसणे,
विनाकारण रडणे बस
नको नको ती फुलं
मावळली ती
कोमेजली ती
सुवास नाही,
दुर्गंध सुटे त्यांना
गुदमरणारा दुर्गंध

उठ, उठ ना चांदनी
बघ क्षितिजाकडे
पाठमोरी उभा आहे तो
बघ त्याचे स्नायू
किती सुंदर, किती खंबीर

दुखः, दुखतंय ना चांदनी?
बांध पट्टी नसावर
गाड ती सुरी
तसल्या विचारांना आता
अंकुर ही फुटायला नको

गेल्या, गेल्या त्या चांदनी
वाहून गेल्या त्या लाटा
आता तीरावर उभी तू
पायाखालची माती मऊ
चमचमित, लुकलुकीत
पण आत ओढुन घेईन,
भक्षण करेल  गं तुझं!

बघ, बघ गं चांदनी
एकटी नाहीस तू
शांतपणे उभा आहे तो
हाक ही मारत नाही
नुसता उभा आहे
वाट पाहत,
क्षितीज…

सूट, सूट आता चांदनी
वाऱ्यासारखी सूट
लाव कुलूप मेंदुला
पुन्हा हो बेभान
लाव कुलूप आठवणींना  
आठवणींच्या त्या कपाटाला
दाब मातीखाली
आणि पळ…
पळ त्याच्या दिशेने

बिलग, बिलग त्याला चांदनी
तोड हंबरडा  
काढ दात बाहेर
अन चाव त्याला
तुझ्या वेदनेचा
फुटू दे पूर त्याच्या मानेवर

वळेल, वळेल तो चांदनी
गप्पच हसेल
तुझ्या डोळ्यात पाहून,
"मूर्ख" म्हणेन तुला
आणि घेईल तुला कुशीत

रमशील, रमशील तू चांदनी
त्या ऊबीत, त्या गंधात,
त्या सुरक्षितेत
मग त्याच्या खांद्याशी
बोलताना, हसताना, रडताना
येऊन थांबेल एक थेंब,
लाल,
तुझ्या जीभेवर

गिळताना मग पडेल प्रश्न
रक्तं तुझं कि त्याचं?!
मग कडाडेल वीज एकदा
ढग सरकतील बाजूला
अन सुटेल कोडं

हसशील, हसशील गं चांदनी
आकाशाला तोंड देऊन
तोही हसेल  सोबत
उलटी करेल टोपली
जल-सुमनांची

ती नाही, ते नाही
ती आणि तू नाही
ते ही नाही
कुणीच नाही
फक्त तो, आणि तू
आणि,
फक्त
तू, तू, तू

मग घेशील हातात हात
अन चालशील त्याच्यासोबत
त्याच एकुलत्या, स्पष्ट वाटेवर
शेवटचा
शेवटपर्यंतचा
वेडी, वेडी गं चांदनी…

- चांदनी गिरीजा

(Thanks Manoj Bhandare for proofreading)

No comments:

Post a Comment