Roots

Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Friday, October 6, 2023

नाही

काळोख असा वाकुन पडलाय
रात्र चिंब-चिंब रडत आहे

मी नाही उचलणार तुला
बिलगू देणार नाही

माझा पान्हा मी साठवत आहे
तुझ्या संगोपणाला नाहीये 
तुझ्या फाटक्या कंठानी 
रडत बस
मी पाऊल टाकलाय बाहेर
या क्षितिजातुन

दिवस कसा अनेकरंगी येतोय
मोरपिसासारखा 
कुरवाळतोय, ओठांना माझ्या
हे असे मला गुदगुल्या होतात
विसरले होते 
-
चांदणी गिरिजा
ऑक्टोबर ६, २३

छायाचित्र: अंजना सी.

Friday, April 7, 2023

डोळस पाणी



दिवस ०७/३० । ३० दिवसात ३० कविता । राष्ट्रीय कविता लेखन महिना #napowrimo




Monday, June 13, 2022

तडजोड

किती किती पाहिले
तुला कापून टाकायला
माझ्या माझ्या अंगातून
तुला सरासर काढायला
विर्घळास बराच
सूर्यास्त झालाय तुझा
पण अचानक सापडतात
अंश तुझे
नुस्त आयुष्य जगताना
इतक्या वर्षांनी आता
चिडण्याचाही कंटाळा येतो
रोगांवर चिडून काय उपयोग?
मग नग्न डोळ्यांनी पाहते
माझ्या पाणेरी देहावर
स्पर्शून जाणारे
बोचरे
अंश तुझे
-
चांदणी गिरिजा
जून १३, २०२२

Wednesday, April 27, 2022

पुन्हा, पाऊस


हे डोळे आहेत ना 
हे रंग आहेत ना 
मला दिसत आहेत ना 
आणि 
नि नि नि 
आणि 
डोळे मिटल्यावर 
हे रंग माझ्यावर 
वर्षाव करत आहेत ना 
कृतज्ञ आहे मी
-
चांदणी गिरीजा 

दिवस २७/३० । ३० दिवसात ३० कविता । राष्ट्रीय कविता लेखन महिना #नापोरिमो 
#napowrimo #napowrimo2022

Photo by Matheus Bertelli, procured at Pexels 

Monday, April 25, 2022

ओली


अंगावरून गेली एकच ओळ
आणि झाली आंघोळ
-
चांदणी गिरिजा

दिवस २५/३० | ३० दिवसात ३० कविता | राष्ट्रीय कविता लेखन महिना #नापोरीमो 
#napowrimo #napowrimo 2022


Photo by Mathias P.R. Reding procured at Pexels

Friday, April 22, 2022

९:३२ ची लास्ट लोकल

माझा बीज मला इथून काढावा लागेल
तुझ्या गटारीत काय
माझा कमळ फुलणार नाही
-
चांदणी गिरिजा

दिवस २२/३० | ३० दिवसात ३० कविता | राष्ट्रीय कविता लेखन महिना #नापोरीमो #napowrimo #napowrimo2022

Monday, April 18, 2022

एवढच

रातांची मजा
पुन्हा कळायला लागली
चांदणी पुन्हा
हसायला लागली
-
चांदणी गिरिजा

दिवस १८/३० | ३० दिवसात ३० कविता | राष्ट्रीय कविता लेखन महिना #नापोरीमो

Monday, April 11, 2022

आज समुद्र बोलका आहे

आज समुद्र बोलका आहे ...
बोल, बोल जितकं बोलायचंय तुला
ऐकते मी
कैद होते ना मी दोन वर्ष
बेरंगी सीमेंटीच्या जंगलात
सुटले आज
आणि इतक्या दिवसांनी
भेटत आहोत आपण 
बोल, बोल जितकं बोलायचंय तुला
ऐकत आहे मी
रात्र होऊ दे आज
उद्याची सकाळ होऊ दे
बसुयात आपण 
साऱ्या जगालाच विसरून
सकाळ होता होता
कंठ दुखायला लागेल तुझा
तेव्हा मात्र कुशीत घे मला
वाहत ने मला
त्या तटाला ने मला
इथल्या काळोखानंतर
तिथला सूर्योदय पाहायचंय मला
नेशील ना, सखया?
तुझ्या अक्रोशात शांत होत आहे मी
बोल, बोल जितकं बोलायचंय तुला
ऐकत आहे मी
-
चांदणी गिरिजा

दिवस ११/३० । ३० दिवसात ३० कविता । राष्ट्रीय कविता लेखन महिना #नापोरीमो 
#napowrimo #napowrimo2022

Thursday, April 7, 2022

सडपातळ

मला विचारू नकोस 
दुपारच्या तीन वाजता 
मला चिमण्यांचा विचार का येतो 
येतो रे विचार 
मला काळजी वाटते त्यांची 
माझ्या लहानपणाच्या अंगणात 
ते उदंड, विपुल, अमाप प्रमाणात असायचे 
आता विखुरलेत 
कोठे, कोठे गेलेत रे चिमण्या?!
कोठे गेलेत चिमण्या?!
अश्या अभिजात इमारतींत 
सुसंस्कृत बाई म्हणून 
नाही राहायचंय मला!
गचाळ आहे हे सगळं!
अनावर आगळिकीला घडी घालून 
सभ्यता म्हंटलेलं आहे 
माझा विरोध आहे रे 
म्हण, म्हण मला वेडी 
मला मूर्ख म्हण 
पण मला बोलायचं आहे रे 
मला ह्या भिंती फोडायच्या आहेत 
नको, नको आपला हा फाल्स सीलिंग,
हं? 
तोडते मी 
मला पळायचं आहे रे 
मला वाचवायचंय 
मला चिमण्यांना वाचवायचं आहे रे!!!
-
चांदणी गिरीजा 
दिवस ०७/३० । ३० दिवसात ३० कविता । राष्ट्रीय कविता लेखन महिना #नापोरीमो 
#napowrimo #napowrimo2022

Saturday, December 25, 2021

Monday, April 19, 2021

शेवटचा पत्र

पडू दे प्रकाश,
कोवळ्या उन्हाचा 
बसुया आता शांतपणे
बाकेवर आपल्या
तू बस उत्तराकडे तोंडकरून
मी बसते दक्षिणेकडे पाहत
वाहू दे काळाच्या समुद्राला आपल्या पायांखाली
वाहू दे काळाला
तुझ्या-माझ्या पायांना स्पर्शुन निघतील
अवशेष भूतकाळातले
आपण जगलेल्या काळाचे
स्पर्शूदे!
तुझं वाहतुक वेगळं असेन, माझं वेगळं
माझ्या करड्या वेल्क्रो शू-ला आता ती
आइस-क्रीम स्टिक येऊन चिटकलिये
त्या आठवणीच्या कुशीत,
माझे डोळे खुदु-खुदु हसतायेत
तू बरोबर बोललेलीस,
"इट ट्रॅव्हललेड हॅप्पीली एव्हर आफ्टर"
कारण ती स्टिक काळाच्या कुठल्याही ऍक्सिस वर सापडली,
हासूच आणते
कसली ती  स्टिक गं!
माझ्या शू-मध्ये काही काटे रुतलेले
नकळत,
घेऊन चालत होते,
आणी अचानक एकेदिवशी मी झटकलं त्या पायाला
त्यासोबत आजून काही गोष्टींना
काळांतराने एक-एक काटा ढासळत गेला
एक-एक भोक भरत गेला
चुका तर कुणाचेच न्हवते
फक्त तो काळ होता, अनोळखीचा, अलवचिकपणाचा
नाहीतर हाताळलो असतो व्यवस्तीत
पण ते सगळं पुढे वाहिलंय
वाहतंय
वाहणार
प्रकाशमय मनांना शेवटी प्रकाश सापडतोच
माझ्या शू-ला आजून काही अवशेष
झर-झर स्पर्शून निघतायेत 
झाडाखालचा तो तपकिरी प्रकाश
टेबलावरचं तो डब्बा
तीन-वाजताची चहा
फार्म-रोडवरची पावलं
देवनार-ते-दादरचा बस
'तोरण' मधला प्रशस्त जेवण
'वोक' मधला फालतू सिझ्झलर
तासन-तासांचा ऑफिस-पलायन
गाणी, कित्येक गाणी!
संदीप खरे!
तासन-तासांच्या व्हाट्सेप गप्पा
मध्यरात्रीची लुकलुकणारी सह-लिखित कविता
आजून काय काय!
बघ ना पाण्याकडे,
हासवे वाहावताना किती जलद वाहते
आणि आसवे वाहावताना किती हळू
वाहू दे पाण्याला.
तुझ्या क्रीम स्लिप-ऑनला आता काय चिटकलाय गं?
तुझी वाहतुक कशी आहे-
वेगवान कि मंद?
मंद असेन
तुझे हात गुंतलेत ना!
कित्येक जबाबदाऱ्यांमध्ये
अभ्यास, घर, घरचे, ऑफिस
वाहू दे जसं वाहतंय.
मीही गुंतलेले
इतर-इत्यादी मध्ये
बाकेवरची माझी जागा रिकामी पडलेली
स्तब्ध होते, बर्फ़ासारखी
पुन्हा मग माझ्या दिशेने सूर्य उगवला
जमलं विरघळायला
विरघळतीये
गेल्या काही दिवसांच्या विचारात
अश्रू ही वाहतायेत
वाहू दे अश्रूंना!
हे वाहणं तर मनाचच
बाह्य-मनाचा
अंतर-मन तर शांतच असतो
त्याला काहीच नकोय
त्याला सगळंच स्वीकार्य आहे
आणि तेच सत्य आहे
आपलं म्हणून खरं काहीच नाही
सुदैवाने जगण्याची हि संधी मिळालीये
आणि आपण जगतोय
जगू दे किरधारांना!
हो सखे,
शांत होऊया
बसुया शांतपणे
बाकेवर आपल्या
तू बस उत्तराकडे तोंडकरून
मी बसते दक्षिणेकडे पाहत    
एक दिवस पश्चिमेकडुन उगवेल सूर्य
आणि आपल्या सावल्या भेटतील पूर्वाकडे
बाकेच्या मध्यभागी
त्या दिवशी उठूया
मी माझा वेल्क्रो-शू काढून टाकेन
तू तुझा स्लिप-ऑन
आणि अनवाणी पायांनी
समुद्र किनाऱ्यावर सोबत चालूया
किंवा सूर्य जर उगवलाच नाही
हिवाळा गाठून बसला आपल्या बाकेला
तर त्या दिवशी उठूया
तू चाल उत्तराच्या दिशेने
मी चालेन दक्षिणेकडे
सोडूया आपला बाक
आठवणींच्या एका कप्यात
तुझ्या मनातला एका कप्यात
आणि माझ्या मेंदूतला एका कप्यात
आणि काळाच्या कुठल्या ऍक्सिस वर
तो कप्पा हलला
तर बसत जाऊया त्या बाकेवर
वेग-वेगळं, एकटं
होऊ दे जसं होतंय!
सध्या वाहू दे काळाला
फक्त वाहतूक मुक्त असू दे
पाण्याच्या खारटपणात
गोडी हरवायला नको
हासवे विसरायला नको
तू दिलेला तपकिरी प्रकाश विसरायला न
को
हसण्याचे
जिवंत, सक्रिय होण्याचे
दिलेली छोटी-छोटी कारणे विसरायला नको
बाकी सगळं
आकाश, तारका, चंद्र
दगड, खडक
निर्मिती, विश्व, अस्तित्व
लावलेला जीव
त्याचा
कच्च, कोरं
सत्य आणि सातत्य
तसंच राहीन.
-
चाँदनी गिरीजा
एप्रिल १९, २०२१ 

Day 19 of 30 | 30 Poems in 30 Days | National Poetry Writing Month #napowrimo

Monday, April 5, 2021

एकांत

दरवळणारा गुलमोहराचा फूल बोलला-
"का तिथेच थांबलीस?
पाखरूबाई, ये ना जवळ
तुझ्या रंगांनी मला स्पर्श कर ना
तुझा जांभळा माझ्या पिवळ्यात मिसळू दे ना!"
फुलपाखरू म्हणाली,
"नाय राव, माझा इस्वास नाय तुझ्यावर
ह्यावर्षीला पिवळा, पुढच्याला लाल असशील नाय तू?
ग्वाड ग्वाड बोलून फसवून घेशील
माझं मग व्हायचं काय?"
फूल लबाड न्हवताच 
पण भूतकाळातली फसवणुकीची दोरी 
आजही फुलपाखरूच्या मानेवर 
गुंतून होती 
लांबशी दोरी, बर्याच गाठी 
फुलपाखरू कशी सुटेन?
आज फूल एकटाच राहिला 
फुलपाखरूही एकटीच 
तो जुणा अपराध मात्र 
काळाच्या ऍक्सिस वर 
लांबावत लांबावत चाललाय. 
-
चांदणी गिरीजा 
एप्रिल ०५, २०२१  

Day 05 of 30 | 30 Poems in 30 Days | National Poetry Writing Month #napowrimo #napowrimottt2021

Friday, December 4, 2020

तंटा

तुझा माझा तंटा
म्हातारा झालाय गं
तू तरुण आहेस अजून परी
तुझ्या 'घेऊन बसण्याल्या' अजून धार आहे
म्हातारी होशील ना
तेव्हा ज्या गोष्टींचा त्रास करुन घेतेस
त्यांचाच सौंदर्य दिसेल तुला बघ!
शरीराच्या म्हातारपणाचं एक आहे मात्र
शरीर कुठेना कुठे जाउन थांबतोच
मग त्या क्षणाला 
फोन लावायला 
ही म्हातारी मैत्रीण असेल का?

- चांदणी गिरीजा

Tuesday, August 4, 2020

चित्र

मला तुझ्यात काय आवडलं?

तसे काहीच नाही.

वर-वरचं हसून बोलायला शिकलेय मी

माझ्यातलं माझेपण लपवायला शिकलेय मी

मी तुझं कौतुक केला असेन तर

त्यावर जाऊ नकोस

पण एक चित्र डोळ्यांवर ठसून आहे

निरोप घेऊन मी वळत असतांना

तुझ्या सावलीचा एक भाग दिसत होता

तू दोन क्षण थांबला होतास तिथे

त्या थांबण्यात ओढ न्हवती

काळजी होती

"ही जात आहे का व्यवस्थित?"

मऊपण होतं त्या सावलीच्या तुकड्यात

बाकी तुझ्या वर-वरच्या रेषांशी 

माझं इतकं घेणं-देणं नाहीये

कळलं का आता

काय आवडलं ते?


-चा.गि.
13-10-18

हट्ट

थेंबाच्या मनात आलं
कोरड्याला जरा ओलं करावं
पण कोरडा हट्टीच



- Jan 27, 2019

Sunday, March 8, 2020

निनाद

आवाज होतंय
आत आवाज होतंय
माझी मांजरं माझ्याशी बोलतात
तसलं काहीतरी
शब्द नेमके कळत नाहीये
पण स्वर कळत आहे
त्रस्त
त्रस्त
कोणालातरी सांगायला हवंय
पण सांगण्यासाठी शब्द कोठे माझ्यापाशी?
रौद्र स्वरात आवाज करू?
त्यांनातरी काय कळणार?
त्यांना ऐकायचं तरी असेल का?
नको
नकोना
झाडाच्या एकांतात का त्याची पानं पडतात?
हिवाळा नसतो, वारा नसतो
तरी त्याची पानं पडतात
त्यानेच पाडली असावीत,
नाही का?
झाड रडत ही न्हवता ना
पानांनी मग घेतलं असावा
झाडाचा निनाद त्यांच्या अंगात
म्हणून स्वतःहून फाडून घेतलं असावा
त्याच्या फांदीवरून
त्याच्या अंगावरून
स्वतःला
पानांना दुखलं असेल का?
आणि
ज्या मातीवर ती पानं पडली
त्या मातीने तरी ऐकलं असेल का?!
०८-०३-२०

Thursday, November 22, 2018

मधुक

तू धूर आहेस की मी?
कोण तरंगत आहे?
कोण पाहत आहे?
मला दिसतंय की तू हलत आहेस
पाण्यासारखं
वाहत नाहीयेस
पण तुझ्या असण्याला एक 'कल-कल' आहे
कसं सांगू
कसं अनुभवत आहे मी तुला?
पाहत बसावंसं वाटतंय
मलाही तसंच नाचू वाटतंय
"कल. कल."
वाऱ्यामुळे होतंय का?
नेमकं कोण हलत आहे,
सांगशील का?!
मधुका, जवळ येशील का?

Monday, October 22, 2018

सोनं


बाकेवर आम्ही बसलो होतो
चहा पीत
कालवा होता, ट्रॅफिकचा
आम्ही शांत होतो
माझं चहाशी संवाद सुरु होता
मध्येच हसले वाटतं
त्याने विचारलं, "काय झालं?"
"वेड्यासारखी एकटीच हसतेस..."
मी म्हणाले, "अरे माझा आज आईशी वाद झाला."
"कशावरून?"
"चहावरून."
"मग हसतेस का?!"
"वाद झाला म्हणून."
"ऐ!"
"तुला नाही कळणार."

Saturday, March 3, 2018

पन्हं आणि पान्हा

किती फरक आहे?
दोन्ही गोड, दोन्ही लोभस.
दोन्ही उन्हात आराम आणणारे.
कालच माझा कंठ फाटून वाहत होता. मी म्हंटलं स्वतःला, "आता बस. यापुढे नाही." मग कात्री घेतली, ती धडधडणारी नसच कापून टाकली. नसे-सहित सगळंच निष्फळ सामग्रहीला दफन केले.
आह! आह-हा-हा! किती बरे वाटले. कुठल्यातरी पिंजऱ्यातून सुटल्यासारखे वाटले. का बंधिस्त होते मी इतके दिवस? किती बरे झाले हे सगळे घडले.
आज काय मग मन माझं कोकरासारखं बागडत होतं. रोजचाच एकटा प्रवास, आज किती मजेदार झाला! विनाकारण लोकांशी बोलले, हसले, त्यांना हसवलं.
मीच माझा पन्हं बनवला, नाही का? खरंच गोड असतं बरं का!
पण, पान्हा कोठे? गरज भासतच नाहीये आता. लोभ कडू असतं. हम्म्म. कडू असतं लोभ. 

- चा.गि.
('ह.वि.' टिप्पणीबद्दल धन्यवाद)

Wednesday, February 1, 2017

The Song of Fatigue

ये माघारी गं फुलणारी
घेऊन गोष्टींची उशी
यथार्ताशी करूनही लग्न
झाले मी अनवाणी
तुझ्या पांघरुणाचा अंधार आण
तुझा घाम, काखेचा वास आण
शिशिरात कात माझी फाटली
तुझ्या ऊबीचा विणकाम आण

- चा.गि.
25-12-16