बोल, बोल जितकं बोलायचंय तुला
ऐकते मी
कैद होते ना मी दोन वर्ष
बेरंगी सीमेंटीच्या जंगलात
सुटले आज
आणि इतक्या दिवसांनी
भेटत आहोत आपण
रात्र होऊ दे आज
उद्याची सकाळ होऊ दे
बसुयात आपण
साऱ्या जगालाच विसरून
सकाळ होता होता
कंठ दुखायला लागेल तुझा
तेव्हा मात्र कुशीत घे मला
वाहत ने मला
त्या तटाला ने मला
इथल्या काळोखानंतर
तिथला सूर्योदय पाहायचंय मला
नेशील ना, सखया?
तुझ्या अक्रोशात शांत होत आहे मी
बोल, बोल जितकं बोलायचंय तुला
ऐकत आहे मी
-
चांदणी गिरिजा
दिवस ११/३० । ३० दिवसात ३० कविता । राष्ट्रीय कविता लेखन महिना #नापोरीमो
#napowrimo #napowrimo2022
No comments:
Post a Comment